एकेकाळी काँग्रेस चा वरचष्मा असणाऱ्या ईशान्य भारतातील ८ राज्यांवर, भाजपने गेल्या ७ वर्षांत, भल्या-बुर्या मार्गांनी पूर्ण पकड मिळवली आहे. लोकसभा निवडणुकीत हिंदी पट्ट्यातून जागा कमी झाल्यास त्याची भरपाई ज्या भागांतून करण्याची व्यूहनीती भाजपने आखली,त्यातील महत्वाचा भाग म्हणजे ईशान्य भारत. या ८ राज्यांमध्ये मिळून लोकसभेच्या २५ जागा आहेत. त्यापैकी २०१४ मध्ये १० भाजप आघाडीकडे आल्या. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत तब्बल १८ जागा भाजपने मिळवल्या आहेत. ८ पैकी ४ राज्यांमध्ये भाजपचा मुख्यमंत्री आहे. तर उर्वरित ४ राज्यांमध्ये भाजप चा पाठींबा असलेल्या पक्षाचा मुख्यमंत्री आहे.
ईशान्य भारतातील सर्वात मोठे आणि राजकीय दृष्ट्या महत्वाचे राज्य म्हणजे आसाम. आसाम च्या निकालाचे राजकीय पडसाद उर्वरित ७ राज्यांमध्ये हि पडतात. शिवाय २०२४ लोकसभा निवडणुकीत आपले वर्चस्व टिकवण्यासाठी भाजपसाठी आसाम विधानसभा निवडणूक महत्वाची आहे.
दुसरीकडे काँग्रेस साठी हि अस्तित्वाची लढाई आहे. २०१६ च्या विधानसभा निवडणुकीत सलग पंधरा वर्षे सत्तेत असणाऱ्या काँग्रेस ची अवघ्या २६ जागांवर (१२६ पैकी) गच्छंती झाली. लोकसभेत हि काँग्रेसचे संख्याबळ केवळ ३ (१४ पैकी) वर आले आहे. ईशान्य भारतात राजकीय पुनःप्रवेश करण्यासाठी, तसेच आगामी लोकसभा निवडणुकीत आपले मनोबल वृद्धिंगत करण्यासाठी काँग्रेसला या निवडणूकीत विजय महत्वाचा आहे. शिवाय जून मध्ये काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठीची निवडणूक होऊ घातली आहे.जी २३ या गटामधील काँग्रेस नेते पक्ष नेतृत्वाला आव्हान देण्याच्या भूमिकेत आहेत. त्याची एक झलक त्यांच्या जम्मू मधील कार्यक्रमातून दिसून आली. या पार्श्वभूमीवर केरळ व आसाम मध्ये सत्तापरिवर्तन झाल्यास ते राहुल-प्रियांका गांधी यांच्यासाठी शुभसूचक ठरेल.
गटबाजीवर मात
१५ वर्षे मुख्यमंत्री राहिलेले जेष्ठ नेते तरुण गोगई यांचे निधन झाल्यामुळे, यांच्या अनुपस्थित हि निवडणूक होत आहे. गटबाजी काँग्रेससाठी सर्वत्र डोकेदुखी राहिलेली आहे. तरुण गोगई चे दीर्घकाळ सहकारी मंत्री राहिलेल्या हिमंत बिस्वा सरमा यांनी गटबाजीतून काँग्रेस ला सोडचिठ्ठी देत भाजप मध्ये प्रवेश केला होता . मागच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने जो विजय मिळवला त्यामध्ये शर्मा यांचा सिंहाचा वाटा होता. आता तरुण गोगाई यांच्या अनुपस्थित काँग्रेसमधील गटबाजी उफाळून येईल अशी अनेकांना शंका होती. परंतु गौरव गोगई, रिपून बोरा, प्रद्युत बार्डोलाई, देबब्रत सैकिया, सुश्मिता देव अशा सर्व प्रमुख नेत्यांमध्ये एकजूट दिसत आहे. हि काँग्रेसच्या दृष्टीने जमेची बाजू आहे.
छत्तीसगड चे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी स्वतः संघटना बांधणीकडे लक्ष दिले आहे. बूथ पातळीवर कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण, चिंतन शिबीर याची त्यांनी तजवीज केली. आत्मविश्वास गमावलेल्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य आणण्यात बघेल यांनी महत्वाची भूमिका पार पाडली आहे असे म्हटले जाते.
महाजोत चे गणित
आघाडीचे गणितही काँग्रेस ने जमवले आहे. काँग्रेस प्रणित ‘महाजोत’ आघाडीत १० पक्ष सहभागी आहेत. यातील दोन अत्यंत महत्वाचे पक्ष म्हणजे बोडोलँड पीपल्स फ्रंट (बीपीएफ) आणि ऑल इंडिया युनाटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (एआययुडीएफ).
बीपीएफ मागच्या निवडणुकीत भाजप प्रणित आघाडीमध्ये होते. अप्पर आसाम मधील बोडोलँड भागामध्ये बीपीएफ चा प्रभाव आहे. मागच्या निवडणुकीत या पक्षाने १२ जागा जिंकल्या होत्या. याशिवाय चहा कामगार आदिवासी जमातींवर प्रभाव असणारी ‘आदिवासी नॅशनल पार्टी’ आणि लखीमपूर जिल्हयात प्रभाव असणारी ‘देओरी पीपल्स पार्टी’ देखील ‘महाजोत’ मध्ये सहभागी आहेत. परिणामी हिंदू, आहोम आणि असामी भाषा बहुल अप्पर आसाम मध्ये काँग्रेस ची ताकद वाढली आहे.
बद्रुद्दीन अजमल यांच्या एआययुडीएफ चा प्रभाव प्रामुख्याने बराक व्हॅली व लोवर आसाम मध्ये आहे. या पक्षाची मुस्लिम मतदारांवर पकड आहे. आसाम मध्ये मुस्लिम मतदारांची संख्या ३०% आहे. एआययुडीएफ २००६ च्या निवडणुकीपासून स्वतंत्र लढत आली आहे. गेल्या तीन विधानसभा निवडणुकीत या पक्षाला अनुक्रमे १०, १८, १३ जागा मिळाल्या. मागच्या निवडणुकीत ७४ उमेदवार अजमल यांनी उभे केले होते. त्यापैकी १९ जागांवर काँग्रेस व एआययुडीएफ ला मिळालेल्या मतांची बेरीज हि भाजप आघाडीच्या विजयी उमेदवारांपेक्षा अधिक होती. त्यामुळे काँग्रेस व अजमल यांनी एकत्र येणे यामागे मताची विभागणी टाळणे असे गणित आहे.
मागच्या विधानसभा निवडणुकीत ‘महाजोत’ मध्ये आता सहभागी असणाऱ्या पक्षांना मिळालेल्या मतांची बेरीज केल्यास ती ४९% होते. तर भाजपची ३८% च राहते. अशीच स्थिती या निवडणुकीत राहील असे नव्हे, परंतु काँग्रेस ने जुळवलेल्या आघाडीची ताकद मात्र भाजपला निर्णायक शह देऊ शकेल अशी आहे असा निष्कर्ष मात्र निश्चित काढता येतो.
सीएए आंदोलनाचा प्रभाव
डिसेंबर २०१९ मध्ये नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) संसदेने पारित केला. यानुसार शेजारी राष्ट्रांमधून ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत भारतात आलेल्या मुस्लिम वगळता इतर धर्मियांना नागरिकत्व देण्याची तरतूद केली गेली. याला सर्वात पहिल्यांदा विरोध आसाम मध्ये सुरु झाला. आसाम मध्ये १९७९ ते १९८५ या काळात बंगाली भाषिक हिंदू तसेच मुस्लिम स्थलांतरितांना आसाम मधून बाहेर काढण्यासाठी मोठे आंदोलन झाले होते. सीएए मुळे हिंदू स्थलांतरितांना नागरिकत्व मिळेल अशी भीती निर्माण झाली. त्यामुळे सीएए कायदा पारित झाल्यानंतर मोठी आंदोलने आसाम मध्ये झाली. या आंदोलनाचा चेहरा अखिल गोगई झाला. तो अजूनही एनआयए च्या कस्टडीत आहे. ४ दिवसांपूर्वीच त्याने एनआयए च्या कस्टडीत आपले हाल केले जात आहेत. भाजप मध्ये प्रवेश केल्यास जामीन दिला जाईल असे एनआयए आपल्याला सांगितले आहे असा दावा केला आहे.
अखिल गोगईने राईजोर दल ची स्थापना केली आहे. हा पक्ष ३२ जागा लढवत आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आसू व एजेवायपी या दोन विद्यार्थी संघटनांनी ‘असोम जातीय परिषद’ या पक्षाची स्थापना केली आहे. या दोन संघटना १९७९-८५ च्या आंदोलनाच्या केंद्रस्थानी होत्या. त्यांनीच १९८५ साली असोम गण परिषद या पक्षाची स्थापना केली होती, जो भाजप आघाडीचा भाग झाला आहे. परिषदेने ७८ जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत.
सीएए आंदोलनाच्या पार्शभूमीवर स्थापन झालेले हे दोन्ही पक्ष असामी अस्मितेचे प्रतीक होऊ पाहत आहेत. या दोन्ही पक्षांनी बद्रुद्दीन अजमल च्या सहभागामुळे ,महाजोत मध्ये सहभागी होणे टाळले आहे. या पक्षांचा अप्पर आसाम मध्ये मुख्यते भाजपला फटका बसेल अशी चिन्हे आहेत. अजमल बरोबरीला आघाडीमुळे काँग्रेस ची नाराज मतेही या पक्षांकडे वळू शकतात. कोणाला किती फटका बसेल हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होईल.
भाजपची व्यूहनीती
भाजपकडे उपलब्ध असणाऱ्या संसाधनांशी महाजोत स्पर्धा करू शकत नाही. मुख्यमंत्री सरबानंद सोनोवाल आणि हिमंत बिस्वा सरमा या दोन्ही नेत्यांचा प्रभाव टिकून असणे हि भाजपच्या दृष्टीने जमेची बाजू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता ही टिकून आहे. असोम गण परिषद आणि बोडो भागातील युपीपीएल या पक्षांबरोबर भाजपची आघाडी आहे. भाजपने आपल्या प्रचारात मुख्य लक्ष्य काँग्रेस व बद्रुद्दीन अजमल यांच्या आघाडीला केले आहे. धार्मिक ध्रुवीकरण हा मंत्रच भाजप वापराताना दिसत आहे. अजमल यांची भीती दाखवून अप्पर आसाम मधील मतांचे ध्रुवीकरण करणे हीच प्रमुख नीती भाजपने आखली आहे. शेजारच्या पश्चिम बंगाल मध्ये सीएए च्या अंमलबजनावणीचे आश्वासन देताना आसाम मध्ये मात्र त्या विषयावर भाजपने मौन ठेवले आहे.
निवडणूक पूर्व सर्व्हेचा कौल
एबीपी न्यूज- सी वोटर निवडणूक पूर्व सर्व्हे ने २४ मार्च रोजी जाहीर केलेल्या कौलानुसार भाजप आघाडीला १२६ पैकी ६५-७३ तर ‘महाजोत’ला ५२-६० अशा जागा मिळू शकतात.बहुमताचा आकडा ६४ आहे. या सर्व्हेनुसार दोन्ही आघाड्यांमध्ये ४% मतांचा चा फरक आहे. या घडीला भाजपचे पारडे थोडे जड दिसत असले,तरी निवडणुकीच्या ३ फेऱ्या आहेत त्यामुळे यातील कोणत्याही टप्प्यात २-३% मते जरी फिरली तरी महाजोत सरकार स्थापन करण्याची शक्यता निर्माण होते. थोडक्यात आसाम मध्ये ‘काटे कि टक्कर’ होईल हे निश्चित.
सदर लेख दैनिक ‘पुढारी ’ च्या २८ मार्च २०२१ च्या अंकात प्रसिद्ध झाला.
लेखाची लिंक https://www.pudhari.news/news/Bahar/Assam-Assembly-Election-battle-of-existence/m/
लेखक टेलिग्राम वर आहे. लेखकाचे चॅनेल जॉईन करण्यासाठी https://t.me/ABhausaheb यावर क्लिक करा. त्यावर अपडेट्स मिळतील.
ट्विटर- https://twitter.com/BhausahebAjabe
फेसबुक- https://www.facebook.com/bhausaheb.ajabepatil
यु ट्यूब – https://www.youtube.com/c/BHAUSAHEBAJABE