नरेंद्र मोदी- अमित शहा यांच्या नेतृत्वाखालील भाजप ही अत्यंत प्रभावी अशी निवडणूक यंत्रणा झाली आहे. एखादी निवडणूक झाल्यानंतर लगेच पाच वर्षांनी येणाऱ्या त्याच निवडणुकीसाठी भाजप ची तयारी सुरु होते असे म्हटले जाते. परंतु एखाद्या महापालिका निवडणुकीमध्ये केंद्रीय नेतृत्वाने लक्ष घालण्याचा प्रसंग आतापर्यंत आलेला नव्हता. हैद्राबाद महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने मात्र भाजप महापालिका निवडणुक ही मोठ्या ताकदीने लढू शकते हे स्पष्ट झाले. खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप चे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी,उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निवडणुकीत प्रचार केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही त्याच काळात हैदराबाद स्थित एका कंपनीला कोरोना लसीसंदर्भात भेट दिली.

भाजपला कर्नाटक वगळता दक्षिण भारतातील राज्यांमध्ये मुसंडी मारता आलेली नाही. परंतु त्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. त्या दृष्टीने तेलंगणा हे राज्य भाजपने लक्ष्य बनविले आहे. हे राज्य आंध्र प्रदेश पासून वेगळे झाल्यापासून या राज्यावर तेलंगण राज्य समिती (टीआरएस) च्या के. चंद्रशेखर राव यांची पकड आहे. राज्याच्या राजकारणात प्रमुख विरोधी पक्ष असलेली काँग्रेस कमजोर होत चालली आहे. काँग्रेसची जागा व्याप्त करून आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत टीआरएस ला आपण सक्षम पर्याय आहोत हे मतदारांना दाखवून देण्यास भाजप उत्सुक आहे.असा डाव भाजपने गेल्या लोकसभा निवडणुकीत ओडिशा आणि पश्चिम बंगाल मध्ये यशस्वी रित्या खेळला आहे. शिवाय पुढील लोकसभा निवडणुकीत भाजप चा बालेकिल्ला झालेल्या हिंदी भाषिक राज्यांमध्ये जर पीछेहाट झाली तर त्याची नुकसानभरपाई तेलंगणा सारख्या राज्यांमधून व्हावी अशीही भाजपची व्यूहनीती आहे. तेलंगणा मध्ये लोकसभेच्या १७ जागा आहेत. त्यापैकी सध्या ४ जागा भाजपाकडे आहेत. हैद्राबाद महापालिका क्षेत्रात विधानसभेच्या २४ जागा आहेत. म्हणजे महापालिकेवर पकड मिळाल्यास या जागांवरही लगेच थेट प्रभाव पाडता येईल असेही गणित आहे.

नुकत्याच झालेल्या दुबाका या मतदारसंघातील पोटनिवडणुकीने भाजप चा आत्मविश्वास वाढवला. टीआरएस चा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात भाजपने विजय मिळवला. त्यामुळे उत्साह वाढलेल्या भाजपने हैद्राबाद महापालिका निवडणूक प्रतिष्ठेची केली.

धार्मिक ध्रुवीकरण

भाजप सातत्याने प्रत्येक राज्यामध्ये ‘धार्मिक ध्रुवीकरण’ करून त्याचा लाभ उठवण्याचा प्रयत्न करते. दिल्ली विधानसभा निवडणुकीत ते प्रकर्षाने दिसले होते. पुढील वर्षी होणाऱ्या पश्चिम बंगाल च्या विधानसभा निवडणुकीत भाजप ध्रुवीकरणाचाच खेळ खेळेल अशी चिन्हे आहेत. त्या आधी हैद्राबाद मधेच त्याच परिचित खेळाची झलक दिसली. योगी आदित्यनाथ यांनी हैदराबादचे नामांतर ‘भाग्यनगर’ करू अशी आश्वासन दिले . तर अमित शहा यांनी ‘निझामी संस्कृती’ पासून हैद्राबाद मुक्त करू अशी घोषणा केली. जमातवादी वक्तव्यांसाठी कुप्रसिद्ध कर्नाटकचे तरुण खासदार आणि भाजपयुमो चे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या यांनी भाजप संपूर्ण दक्षिण भारताचे भगवेकरण करेल व त्याची सुरुवात हैद्राबाद पासून होत आहे असे वक्तव्य केले. हैद्राबाद मध्ये रोहिंग्या मुस्लिम निर्वासित राहतात व त्यांच्यावर सर्जिकल स्ट्राइक करू अशा घोषणाही दिल्या गेल्या.

महापालीकेतील १५० पैकी जवळपास ५० जागांवर मुस्लिम मतदारांचा प्रभाव आहे. उर्वरीत १०० जागांवर हिंदू मतदारांचे ध्रुवीकरण करायचे हे अशा द्वेषपूर्ण प्रचारामागील एक कारण. शिवाय हैद्राबाद मध्ये एमआयएम चा प्रभाव आहे. तसेच बिहार निवडणुकीने दाखवल्याप्रमाणे असाउद्दीन औवेसी यांचा देशात इतरत्र हि प्रभाव वाढत आहे. पश्चिम बंगाल मध्ये एमआयएम निवडणूक लढवणार आहे. उत्तर प्रदेशातही एमआयएम ची मोर्चेबांधणी चालू आहे. भाजपच्या अशा ध्रुवीकरणाच्या प्रचाराचा उलट ध्रुवीकरण करण्यासाठी एमआयएम ला लाभ होतो. त्यामुळे काँग्रेस व इतर सेक्यलर भूमिका घेणाऱ्या प्रादेशिक पक्षानांच त्याचा फटका बसतो हे एव्हाना सिद्ध झाले आहे. ते महाराष्ट्रातही दिसले आहे आणि नुकतेच बिहार मधेही. हैद्राबादमधील अशा प्रचाराचा ‘राजकीय लाभ’ देशात इतरत्र घेता येईल अशी भाजपची अटकळ होती म्हणुनच ‘हाय प्रोफाइल’ नेत्यांनी तिथे उपस्थिती लावली.

निकालाचा अर्थ

गेल्या निवडणुकीत १५० पैकी ९९ जागा टीआरएसने जिंकल्या होत्या. एमआयएम ४४ , काँग्रेस २ आणि भाजप केवळ ४ जागांवर विजयी झाली होती. टीआरएस ५५ जागांसह सर्वात मोठा पक्ष झालेला असला तरी बहुमताच्या ७६ या बहुमताच्या आकड्यापासून दूर आहे. एमआयएम ने आपल्या ४४ जागा राखल्या आहेत. काँग्रेसची २ जागांसह जी दुर्दशा झाली होती ती कायम राहिली आहे. भाजपने मात्र जोरात मुसंडी मारली आहे. ४ जागा ते ४८ अशी भाजपने झेप घेतली आहे. महापालिकेत प्रमुख विरोधी पक्ष म्हणून स्थानापन्न होणे हि भाजपसाठी मोठी कामगिरी आहे. याचा अर्थ भाजपच्या ध्रुवीकरणाच्या प्रचाराला यश मिळत आहे असाच घेतला जाईल. त्यामुळे आगामी काळात तेलंगण तसेच इतरत्रही योगी आदित्यनाथ, तेजस्वी सूर्याहा हे अल्पसंख्यांकविरोधी आग ओकणारे चेहरे सर्वत्र दिसतील. आणि प्रचाराचे मुख्य सूत्र हे धार्मिक ध्रुवीकरणाचेच राहील हे उघड आहे. केवळ ध्रुवीकरणावर निवडणूक जिंकता येत नाही हे भाजपला माहित आहे. त्यामुळेच विरोधी पक्षातील बलशाली नेते ईडी, सीबीआय चा धाक किंवा सत्तेचे गाजर दाखवून आपल्या पक्षात घेणे हा मार्ग भाजप अवलंबिते. जे सध्या पश्चिम बंगाल दिसत आहे तोच फोडाफोडीचा प्रयोग तेलंगण मधेही दिसेल.भविष्यात टीआरएस ला काँग्रेस पेक्षा भाजपला विरोधी पक्ष म्हणून सामोरे जाणे आव्हानात्मक ठरेल. भाजपच्या ध्रुवीकरणाच्या प्रचाराला सामोरे कसे जावे हा सध्या सर्वच सेक्युलर भूमिका घेणाऱ्या पक्षांसमोरील प्रश्न आहे. आधीच कमजोर झालेल्या काँग्रेससाठी भाजपचा तेलंगणमधील हा वाढत जाणारा प्रभाव धोक्याची घंटा आहे. एमआयएम ने आपली ताकद टिकवून ठेवली आहे. भाजप व एमआयएम चे राजकारण एकमेकाला पूरक आहे. त्यामुळे एमआयएम चा फटका हा शेवटी काँग्रेस व इतर सेक्युलर पक्षांनाच बसणार आहे.

एकूण चंद्रशेखर राव यांनी हैदराबादमधील सत्ता जरी राखली असली तरी तरी त्यांची चिंता आणि भाजपचा आत्मविश्वास वाढवणारा हा निकाल आहे.

सदर लेख दैनिक पुढारी च्या ७ डिसेंबर २०२० च्या अंकात प्रसिद्ध करण्यात आला. लेखाची लिंक –

https://www.pudhari.news/editorial/editorial/It-became-clear-that-BJP-can-also-contest-the-municipal-elections-with-great-strength/

लेखक टेलिग्राम वर आहे. लेखकाचे चॅनेल जॉईन करण्यासाठी https://t.me/ABhausaheb यावर क्लिक करा. त्यावर अपडेट्स मिळतील.

ट्विटर- https://twitter.com/BhausahebAjabe
फेसबुक- https://www.facebook.com/BhausahebAjabeSays/

यु ट्यूब – https://www.youtube.com/c/BHAUSAHEBAJABE

By Bhau

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *