नरेंद्र मोदी-अमित शहा यांनी २०१४ पासून देशभर अनेक काँग्रेसचे नेते भाजपमध्ये आयात केले. त्यांना मंत्रिपदंही दिली. पण अद्याप कोणालाही मुख्यमंत्रीपद दिले नव्हते. आता मात्र काँग्रेमधून भाजप मध्ये येऊन अवघ्या ६ वर्षांत मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याचा चमत्कार हिमंता बिस्वा सरमा यांनी केला आहे. नुकत्याच झालेल्या आसाम च्या विधानसभा निवडणुकीत दुसऱ्यांदा भाजप आघाडीला बहुमत मिळाले. त्यानंतर सरमा यांच्या शिरावर मुख्यमंत्रीपदाचा मुकुट ठेवला गेला आहे. आधीचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल हे लोकप्रिय होते. सीएसडीएस या सर्वेक्षण संस्थेने केलेल्या सर्वेक्षणांमध्ये सोनोवाल यांची सरमा यांच्यापेक्षा दुपटीने अधिक लोकप्रियता दिसली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेही त्यांना पाठबळ होते. परंतु शेवटी मुख्यमंत्रीपदाची माळ मात्र ५२ वर्षीय सरमा यांच्याच गळ्यात पडली. ते विजय रूपानी किंवा मनोहरलाल खट्टर यांच्यासारखे अंगठ्याखाली राहणारे व्यक्तिमत्व आहेत म्हणून हि निवड झाली नाही. तर त्यांना मुख्यमंत्री करण्याशिवाय पर्याय शिल्लक राहिला नव्हता हे खरे कारण आहे.
गेल्या ६ वर्षांत सरमा यांनी आसाम च नव्हे तर ईशान्य भारतातील सर्व राज्यात भाजपला जे राजकीय यश मिळवून दिले आहे ते पाहिल्यावर त्यांना मुख्यमंत्री करण्याशिवाय पर्याय का नव्हता याचा उलगडा होतो. सरमा म्हणजे उत्तम संघटना कौशल्य असणारा नेता. २०११ च्या विधानसभा निवडणुकीत तरुण गोगोई यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला तिसर्यांदा सत्ता मिळाली, त्यामध्ये सरमा यांचा सिंहाचा वाटा होता. त्यामुळेच त्यानंतर तरुण गोगोई यांना हटवून आपल्याला मुख्यमंत्री करावे अशी मागणी काँग्रेस नेतृत्वाकडे करण्याइतपत त्यांचा आत्मविश्वास वाढला होता. ते बंड करून २०१५ मध्ये भाजपमध्ये आले ते काँग्रेसला मोठे भगदाड पाडूनच आले होते. त्यामुळे २०१६ मध्ये भाजपला आसाम मध्ये जो विजय मिळाला तो केवळ मोदींच्या करिष्म्यावर मिळाला नसता.त्याला सरमा यांच्या संघटनात्मक ताकदीची आणि त्यांच्या वैयक्तीक लोकप्रियेतची जोड होती.हा ईशान्य भारतात भाजपला मिळालेला पहिला विजय होता म्हणून भाजपसाठी अत्यंत महत्वाचा. सरमांचे राजकीय कौशल्य पाहून त्यांना ‘ईशान्य लोकशाही आघाडी’ (नेडा) या ईशान्य भारतातील भाजप व मित्रपक्षांच्या आघाडीचे संयोजकपद देण्यात आले. त्यानिमीत्ताने सरमा यांनी संपूर्ण ईशान्य भारतावर आपला ठसा उमटवला. ‘काँग्रेसमुक्त भारताचे’ भाजपचे स्वप्न ईशान्य भारतात त्यांनी पूर्ण केले. त्यासाठी अरुणाचल प्रदेश मधील काँग्रेस सरकार त्यांनी ‘ऑपरेशन कमल’ करून पाडले. मणिपूर मध्ये निवडणुकीत सर्वात जास्त जागा काँग्रेसला मिळाल्या असतानाही काँग्रेस ला सरकार स्थापन करू दिले नाही. आज ईशान्य भारतातही आठही राज्ये भाजप किंवा भाजप आघाडीच्या ताब्यात आहेत. अशा सत्तासुखाची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कधी स्वप्नातही कल्पना केलेली नसावी. या यशाचा सूत्रधार हिमंता बिस्वा सरमा हेच आहेत!
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ईशान्य भारतातील २४ पैकी तब्बल १७ जागा भाजपला मिळाल्या. निवडणुकीच्या काही काळ आधी सीएए म्हणजेच नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधातील आंदोलनाची ठिणगी सर्वप्रथम आसाम मधेच पडली होती. त्यामुळे त्याचा फटका भाजपला बसेल का अशी शंका होती परंतु हिमंता बिस्वा सरमा यांनी त्यावर मात केली. या निवडणुकीत त्या आंदोलनाचा परिणाम म्हणून निर्माण झालेले पक्ष रिंगणात असतानाही त्याचा फटका भाजपला बसला नाही. याचे श्रेय सरमा यांच्या रणनीतीला जाते.
याशिवाय विचारधारेची लवचिकता सरमा यांनी कायम ठेवली आहे. त्यांची राजकीय सुरुवात ‘ आसू’ या विद्यार्थी संघटनेपासून झाली. हि संघटना ८० च्या दशकातली आसाम मधील आसामी अस्मितेच्या आंदोलनात मध्यवर्ती होती. याच आंदोलनातून ‘असोम गण परिषद’ हा पक्ष उदयास आला. पण सरमांनी मात्र काँग्रेसची वाट धरली. त्यानंतर भाजप मध्ये आल्यावर भाजपची विचारधारा त्यांनी इतकी सहजगत्या अवगत केली कि २०१४ च्या निवडणुकीत हिंदुत्वाच्या गुजरात मॉडेलची सभांमधून निर्भत्सना करणारे हिमंता बिस्वा सरमा, त्यानंतर धार्मिक ध्रुवीकरणाचा मंत्र कैक वर्षे भाजप मध्ये काढलेल्या नेत्यापेक्षा अधिक निष्ठेने वापरू लागले. ‘आसामी अस्मिते’चे राजकारण हे बंगाली भाषिक हिंदू तसेच मुस्लिम विरोधी आहे. याला छेद देत सरमा केवळ मुस्लिम विरोध करतात. कारण तेच भाजपच्या राजकारणाला अनुकूल आहे. त्यामुळे साखर दुधात जितक्या सहजपणे विरघळते तितक्याच सहजपणे ते संघ-भाजपचे भाग झाले आहेत. संघ शाखेत प्रशिक्षण घेतलेले नसताही सरमा अव्वल दर्जाचे ‘प्रचारक’ झाले आहेत.
शिवाय काँग्रेस मध्ये असताना मुख्यमंत्रीपदासाठी बंड करणारा नेता, त्याच्या आकांक्षा पूर्ण केल्या नाहीत तर भाजपमध्ये दीर्घकाळ शांत राहणार नाही, हे स्वतः पराकोटीचे महत्वाकांक्षी असणाऱ्या मोदी-शहांना चांगले माहित आहे. या निवडणुकीत कोणालाही मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून पुढे आणण्यात आले नव्हते. तेव्हाच स्पष्ट झाले होते कि पुन्हा सत्ता आल्यास हिमंता बिस्वा सरमा हेच मुख्यमंत्री असतील.
सत्तेची पराकोटीची महत्वाकांक्षा म्हणजे हिमंता बिस्वा सरमा. वयाच्या २२ व्या वर्षी त्यांनी आपल्या पत्नीला ‘मी आसाम चा मुख्यमंत्री होईल’ असे सांगितले होते. १९९६ साली पहिल्या निवडणुकीत ते पराभूत झाले. तीही निवडणूक त्या काळी मोठं नाव असणारे भ्रिगु कुमार फुकन या ‘असोम गण परिषद’च्या नेत्याविरुद्ध काँग्रेसचा उमेदवार म्हणून ते लढले. त्यांची राजकीय कारकीर्द मात्र त्यापूर्वीच १९९४ साली सुरु झाली होती. तेव्हाचे काँग्रेसचे मुख्यमंत्री हितेश्वर सैकिया यांनी ते अध्यक्ष असलेल्या विद्यार्थी व युवकांच्या संदर्भातील समितीवर सरमा यांना सचिव म्हणून घेतले होते. २००१ साली ते ज्या जालूकबारी मतदारसंघातून पराभूत झाले होते तिथूनच फुकन यांना पराभूत करून ते विजयी झाले. तेव्हापासून आजतागायत या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत आहेत. लगेचच २००२ मध्ये मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी त्यांना मंत्रिपद दिले. त्यांचा कामाचा आवाका पाहून त्यांना उत्तरोत्तर महत्वाची मंत्रिपद दिली गेली. गोगई यांची सावली म्हणुनच त्यांचा वावर होता.ते गोगाईंचे अत्यंत विश्वासू सहकारी होते. परंतु तरुण गोगई यांनी आपले चिरंजीव गौरव गोगई यांना पुढे आणायला सुरुवात केली. त्यामुळे सरमा हे अस्वस्थ झाले असे सांगितले जाते. पण ते अर्धसत्य आहे. सरमांचा डोळा मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर होता. आणि ते त्यांनी कधी लपवून ठेवले नव्हते. २०१३ मध्ये गोगई यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवावे अशी मागणी करणारे ७९ पैकी ३१ आमदारांच्या सहीचे पत्र त्यांनी काँग्रेस नेतृत्वाकडे दिले होते. हा दोघांमधील विवाद सोडविणे हे दिसते तेवढे सोपे काम नव्हते. नेतृत्वाचा गोगई यांच्याकडे असलेला कल आणि २०१४ मध्ये राष्ट्रीय राजकारणातील परिवर्तन पाहून बदलणाऱ्या वाऱ्याचा वेध सरमा यांनी घेतला व ते भाजपवासी झाले. त्यांच्या भाजप प्रवेशाला सर्बानंद सोनोवाल व केंद्रीय मंत्री किरेन रिज्जू यांचा विरोध होता. पण सरमा यांचे उपयुक्तता आणि उपद्रव मूल्य पाहून सरमांचे भाजप नेतृत्वाने स्वागत केले.
हिमंता बिस्वा सरमा यांनी मुख्यमंत्री होण्याआधीच राज्याच्या राजकारणावर मजबूत पकड बसवली आहे. किंबहुना त्यामुळेच ते मुख्यमंत्रीपदी बसले आहेत. २००२ पासूनच आरोग्य, शिक्षण, नियोजन व वित्त अशा महत्वाच्या खात्यांचा त्यांनी कारभार सांभाळला आहे. आसाम मध्ये आपल्या कारकिर्दीत तब्बल ८ वैदयकिय महाविद्यालये त्यांनी सुरु केली. निवडणुकीदरम्यान ‘ मास्क घालायची गरज नाही कोरोना संपला आहे’ असे विवादास्पद विधान त्यांनी केले होते. पण आरोग्यमंत्री म्हणून मागच्या वर्षी कोरोनावरील उपाययोजनांचे अत्यंत उत्तम नियोजन त्यांनी केले . त्यांचा सल्ला केंद्र सरकारने घेतला असता तर केंद्राच्या अक्षम्य अकार्यक्षमतेमुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने जो हाहाकार माजवला आहे तो कदाचित टाळला गेला असता. महिलांसाठी त्यांनी प्रभावी कल्याणाकरी योजना राबवल्या आहेत. ज्या प्रमाणे नितीश कुमार यांनी महिला मतदारवर्ग आपल्या पाठीशी उभा केला तेच मॉडेल सरमा आसाम मध्ये राबवत आहेत. २००२ पासून मंत्रपदी असल्यामुळे त्यांचा प्रशासनावर पकड आणि वचक आहे. दिल्लीस्थित आणि आसामधील मीडियाने त्यांची ‘लार्जर दॅन लाईफ’ प्रतिमा तयार केली आहे. आसाम मधील एक मीडिया ग्रुप त्यांच्या पत्नीच्याच मालकीचा आहे. त्यामुळे उत्तम प्रशासन आणि त्याला साजेसे मीडिया ‘नॅरेटिव्ह’ याचा प्रभावी मेळ त्यांनी बसवला आहे. भारतातील अनेक प्रभावी राजकारणी क्रिकेट व्यवस्थापनात दिसतात. सरमा देखील त्यास अपवाद नाहीत. २००२ पासून ते ‘आसाम क्रिकेट मंडळाच्या’व्यवस्थापनात आहेत. सध्या अध्यक्ष आहेत. बॅडमिंटन असोशिएसन चे देखील ते अध्यक्ष आहेत. आसाम मध्ये सत्तेचे असे एकही केंद्र नाही जिथे हिमंता बिस्वा सरमा यांचा प्रभाव नाही.
भाजप अंतर्गत गव्हर्नंस व राजकारणाचे स्वतःचे एक मॉडेल हिमंता बिस्वा सरमा उभे करतील हे निश्चित. भाजप मध्ये त्यांना शह देऊ शकेल असा सोनोवालसह एकही नेता नाही, हो निर्माण ते होऊ देणार नाहीत. राजकारणात पोकळी राहत नाही त्यामुळे विरोधी पक्षातून त्यांना विरोध करणारा चेहरा भविष्यात पुढे येईलही. परंतु आगामी २०-३० वर्षांत केवळ आसामच नाही तर ईशान्य भारताच्या राजकारणावर बरी-वाईट अशी अमिट छाप हिमंता बिस्वा सरमा निर्माण करतील यात शंका नाही.
सदर लेख दैनिक पुढारी’ च्या १६ मे २०२१ च्या अंकात प्रसिद्ध झाला.
लेखाची लिंक – https://www.pudhari.news/news/Bahar/Himanta-Biswa-Sarma-Ambitious-politician/m/
लेखक टेलिग्राम वर आहे. लेखकाचे चॅनेल जॉईन करण्यासाठी https://t.me/ABhausaheb यावर क्लिक करा. त्यावर अपडेट्स मिळतील.
ट्विटर- https://twitter.com/BhausahebAjabe
फेसबुक- https://www.facebook.com/bhausaheb.ajabepatil
यु ट्यूब – https://www.youtube.com/c/BHAUSAHEBAJABE