बिहार – राजकारणाचे केंद्रस्थान
देशाच्या राजकारणाची घुसळण ज्या राज्यामध्ये होते ते राज्य म्हणजे बिहार! केंद्रीय सत्तेच्या बाजूने आणि विरोधात असे दोन्ही प्रवाह बिहार मध्ये स्वातंत्र्योत्तर काळात दिसलेले आहेत. राममनोहर लोहिया हे काँग्रेस विरोधाचा पहिला सूर होते. मागासवर्गीयांमधील आकांक्षा आणि राजकीय अस्मिता जागी करणारी ‘पिछडा पावें सौ मे साठ’ हि घोषणा दिली लोहियांनीच. जयप्रकाश नारायण (जेपी) यांनी इंदिरा गांधींविरोधात शड्डू ठोकले ते बिहारमध्येच. संघ-जनसंघ/भाजपला राजकीय मान्यता आणि अवकाश प्राप्त करून दिले ते जेपी आंदोलनाने आणि जनता पार्टीच्या प्रयोगाने. पुढे मंडल (मागासवर्गीयांना आरक्षण) आणि कमंडल (राम मंदिर) च्या बाजूने आणि विरोधात बिहार मध्ये दंड थोपटले गेले. लालकृष्ण अडवाणींनीची रथयात्रा तत्कालीन मुख्यमंत्री लालू प्रसाद यांनी रोखली होती. मात्र जेपींच्या समाजवादी परिवारामध्ये कायम दुफळी दिसली. नव्वदच्या दशकात समाजवादी परिवाराची शकले उडली. त्या त्या राज्यात त्यांनी प्रादेशिक पक्ष उभे केले. त्यातले मुलायम सिंग यादव, लालू प्रसाद यादव सारखे काही संघ-भाजपच्या राजकारणाच्या कायम विरोधात राहिले तर जॉर्ज फर्नांडिस, नितीश कुमार सारखे इतर भाजपच्या वळचणीला गेले.
या निवडणुकीत बिहार पुन्हा एकदा राजकारणाची दिशा आणि नेतृत्व या अर्थाने बदलाच्या उंबरठयावर आहे.
हि निवडणूक का महत्वाची?
१५ वर्षे लालू प्रसाद यादव आणि त्यानंतर गेली १५ वर्षे नितीश कुमार यांच्या हातात सत्तेचा चाव्या राहिलेल्या आहेत. हि निवडणूक मात्र अनेक अर्थांनी निर्णायक ठरणार आहे. कोरोना अद्याप संपलेला नसताना होणारी हि पहिली विधानसभा निवडणूक आहे. हिंदी पट्ट्यातील मतदार राष्ट्रीय राजकारणाला वळण देणारे मतदार आहेत.त्यामुळे बिहार मधील मतदार कशा पद्धतीने प्रतिक्रिया देत आहेत यावरून भावी काळातील निवडणुकांमधील प्रचाराची दिशा ठरेल. हिंदी पट्ट्यातील बिहार हे एकमेव असे राज्य आहे जिथे भाजपला अद्याप एकहाती वर्चस्व ठेवणे शक्य झालेले नाही. या निवडणुकीमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे येण्याची भाजपची मनीषा आहे. चिराग पासवान यांना नितीश कुमारांच्या विरोधात भाजपने फूस देण्याचे कारण हे आहे. त्यामुळे अशा अर्थानेही मतदारांची प्रतिक्रिया कळीची ठरणार आहे. या निवडणूकीमध्ये निधन झाल्यामुळे रामविलास पासवान नसणार आहेत. लालू प्रसाद यादव भ्रष्टाचाराच्या प्रकरणात रांची मधील तुरुंगात आहेत. त्यामुळे तेही प्रचारात नाहीत.. या दोघांच्या अनुपस्थित हि निवडणूक होत असल्यामुळे तेजस्वी यादव व चिराग पासवान यांना मतदार काय पद्धतीने स्वीकारतात यावर भविष्यातील त्यांचे राजकारण अवलंबून राहील. नितीश कुमार यांचे वय ६९ आहे. त्यांच्यासाठी हि निवडणूक शेवटची ठरेल कि अजून एक संधी मतदार त्यांना देतील यावर जेडीयू चे राजकारण अवलंबून आहे. कारण जेडीयू कमजोर झाल्यास जेडीयू च्या राजकीय ताकदीचे विभाजन कोणाला लाभाचे ठरेल यावर बिहारमधे भावी काळात कोणत्या पक्षाचा प्रभाव राहील हे ठरणार आहे.
आघाड्यांचे समीकरण
राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) मध्ये जेडीयू, भाजप, निषाद समाजाचे नेते मुकेश सहानी (व्हीआयपी) आणि दलित नेते जितनराम मांजी (एचएएम) यांचा पक्ष आहेत. ते प्रत्येकी ११५,११०,११ आणि ७ जागा लढत आहेत. तर महागठबंधन मध्ये आरजेडी, काँग्रेस आणि तीन डावे पक्ष आहेत. ते लढत असलेल्या जागा प्रत्येकी १४४, ७० आणि २९ आहेत. याशिवाय बहुजन समाज पार्टी, एमआयएम आणि कुशवाह समाजाचे नेते उपेंद्र कुशवाह(आरएलएसपी) यांनी मिळून ग्रँड डेमोक्रॅटिक सेक्युलर फ्रंट हि आघाडीही निवडणुकीत उभी केली आहे.
केंद्रात एनडीए चा भाग असणारा लोकजनशक्ती पक्ष (एलजेपी) मात्र स्वतंत्र लढत आहे. एलजेपी ने केवळ जेडीयु आणि जितनराम मांजी यांच्या पक्षाविरोधात उमेदवार उभे केलेले आहेत. नितीश कुमार यांच्या विरोधात उघड भूमिका आणि भाजप ला उघड समर्थन अशी भूमिका चिराग पासवान यांनी घेतली आहे. अनेक मतदारसंघात भाजपच्या स्थानिक नेत्यांना एलजेपी ने उमेदवारी दिली आहे. जेडीयू च्या जागा कमी व्हाव्यात आणि भाजपला सर्वाधिक मिळाव्यात अशी त्यामागची योजना आहे. जर असे झाले तर एकतर जेडीयू ला वगळून भाजप-एलजेपी सरकार स्थापन करणे किंवा भाजपचा प्रभाव असणारे भाजप-जेडीयू सरकार स्थापन करणे शकय होईल. दुसऱ्या शक्यतेत नितीश कुमार जरी मुख्यमंत्री झाले तरी सरकारमध्ये भाजपचाच वरचष्मा राहील हे उघड आहे. हा भाजप-एलजेपी चा डाव आहे हे उघड गुपित आहे. यामुळे भाजप व जेडीयू च्या समर्थकांमध्ये अविश्वासाचे वातावरण तयार झाले आहे. निवडणुकीच्या पहिल्या फेरीत जेडीयू च्या जागांवर भाजप-एलजेपी छुपी युती दिसल्यास उर्वरित जागांवर होणाऱ्या निवडणुकीत जेडीयू भाजपाला दणका देऊ शकते.

जातीय राजकारणाची गुंतागुंत
बिहारचे राजकारण जातकेंद्री आहे. ही जातीय समीकरणे कसे रूप घेतात यावर निकाल ठरतो. मुस्लिम-यादव हि व्होटबँक आरजेडीच्या पाठीशी आहे. भूमिहार, बनिया, ब्राह्मण अशा उच्चवर्णीय जाती भाजपचा सामाजिक आधार आहे. तर कुर्मी-कोयरी या जातप्रवर्गातून नितीश कुमार येतात. या समूहाचे संख्याबळ जरी कमी असले तरी नितीश कुमार यांनी यादव व्यतिरिक्त ओबीसी आणि दलित यांची मोट बांधली आहे. पासवान यांचा प्रभाव त्यांच्या दुसाध जातीपुरता मर्यादित आहे.काँग्रेसचा प्रभाव मर्यदित असला तरी प्रामुख्याने उच्चवर्णीय, दलित आणि मुस्लिम मध्ये काही प्रमाणात आहे. बिहारच्या काही भागांमध्ये डाव्या पक्षांचा ओबीसी, दलित आणि मुस्लिमांमध्ये प्रभाव आहे. उत्तर प्रदेशात ज्याप्रमाणे बसपा चा दलित राजकारणावर प्रभाव राहिलेला आहे. तसा दलित राजकारणावर आधारित स्वतंत्र पक्ष बिहार मध्ये उभा राहू शकलेला नाही. पासवान यांनाही संपूर्ण दलित समूहाचा पाठिंबा कधी मिळू शकला नाही. बसपा चा नाममात्र प्रभाव हि बिहार मध्ये नाही.
यातील बिगर यादव-कुर्मी/कोयरी ओबीसी आणि बिगर दुसाध महादलित हे प्रत्येक निवडणुकीत कळीचे ठरतात. या निवडणुकीतही महादलितांची भूमिका निर्णायक ठरण्याचे चिन्ह आहे.
निवडणुकीच्या केंद्रस्थानी असणारे मुद्दे
नितिश कुमार यांचा करिष्मा या निवडणुकीत नाहीसा झालेला आहे. ‘बिजली सडक पाणी’ यावर त्यांनी २०१० मध्ये निवडणूक जिंकली. पण आता आकांक्षा वाढल्या आहेत. रोजगाराच्या संदर्भात लोकं प्रश्न विचारत आहेत. त्या संदर्भात दाखवण्यासारखे फारसे काही नितीश कुमारांकडे नाही. लॉकडाऊन च्या काळात १५ लाखांच्या वर मजूर बिहार मध्ये परतले. त्या काळात ज्या हालअपेष्टांना त्यांना सामोरे जावे लागले त्यासाठी ते नितीश कुमार यांनाच जबाबदार धरत आहेत. या काळात मनरेगा च्या अंतर्गत काम करणारे मजूर वेळेत वेतन मिळत नसल्याविषयी तक्रारी करत आहेत.
सर्व जातींपलीकडे जाऊन महिलांना नितीश कुमारांनी यशस्वीरित्या साद घातली होती. तेच डोक्यात ठेऊन २०१६ साली त्यांनी दारूबंदी चा निर्णय घेतला. पण हा निर्णय आगीतून फुफाट्यात या प्रकारचा ठरला आहे. बिहार मध्ये अत्यंत सहजरित्या दुप्पट दरामध्ये दारू उपलब्ध होते. ज्यांना परवडत नाही ते हातभट्टी/गावठी दारू चे सेवन करत आहेत. दारू न मिळाल्यामुले गांज्याच्या आहारी गेलेल्या लोकांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे दारूबंदीचा निर्णय बुमरँग झाला आहे. दारूबंदीचे उल्लंघन केले म्हणून तुरुंगात खितपत पडलेल्या कैद्यांमध्ये गरीब महादलित व मागासवर्गीय समाजाची संख्या सर्वाधिक आहे.
गाव पातळीवर राबविल्या गेलेल्या नल्ला-नाली आणि नल जल योजनेत प्रचंड भ्रष्टाचार झाला आहे. ‘नल है तो जल नाही और जल है तो नल नही’ अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे एकेकाळी ‘सुशासन बाबू’ अशी ओळख असणारे नितीश कुमार लक्षणीय मतदारांसाठी कुशासन बाबू झाले आहेत. त्यामुळेच आपल्या विकासकामांवर मते न मागता नितीश कुमार लालू प्रसाद व त्यांच्या कुटुंबीयांविरोधात शेरेबाजी करताना दिसत आहेत.
नरेंद्र मोदींविरोधात रोष दिसत नाही. पण नरेंद्र मोदी या निवडणुकीतील मतदारांना एनडीए कडे खेचणारा ‘फॅक्टर’ ही नाहीत.
याउलट तेजस्वी यादव यांच्या सभांना अलोट प्रतिसाद मिळत आहे. रोजगाराचा मुद्दा त्यांनी केंद्रस्थानी ठेवला आहे. पहिल्या कॅबिनेट बैठकीत आपण १० लाख सरकारी नोकरी भरतीचा निर्णय घेऊ अशी त्यांनी घोषणा केली आहे. प्रचाराची दिशा ठरवण्यात तेजस्वी यादव यांना यश आले आहे. आरेजडी सत्तेत आल्यास पुन्हा ‘जंगलराज’ येईल असा प्रचार जेडीयू-भाजप कडून केला जात आहे. परंतु तरुण मतदारांना लालू प्रसाद यांच्या राजवटीविषयी अनुभव नाही, शिवाय आता आरेजडी चा चेहरा लालू नसून तेजस्वी आहेत, त्यामुळे जंगलराज ची भीती कितपत यशस्वी ठरेल याविषयी शंका आहे. परंतु मतदारांचा असाही एक वर्ग आहे ज्याला नितीश कुमार नको आहेत पण तेजस्वी यादव यांना सत्ता देण्यासही ते तयार नाहीत. हे मतदार मतदानासाठी बाहेर पडणे टाळतील कि पर्याय नाही म्हणून पुन्हा नितीश कुमार यांना मत देतील कि स्थानिक उमेदवार पाहून मतदान करतील यावरही बऱ्याच अंशी निकाल अवलंबून आहे.
काटे कि टक्कर
महिन्याभरापूर्वी जेडीयू-भाजप साठी एकतर्फी वाटणारी निवडणूक ‘काटे कि टक्कर’ झाली आहे हे निश्चित. महादलित आणि सर्व जातींमधील जात न पाहता मतदान करणारे १०-४०% मतदार यावेळी कमी अधिक प्रमाणात द्विधा मनस्थितीत आहेत. त्यांचा कौल ज्या बाजूने जाईल ती बाजू या निवडणुकीत विजयी ठरेल. निकाल कोणत्याही बाजूने असो तो बिहार तसेच राष्ट्रीय राजकारणाला महत्वाचे वळण देणारा असेल यात शंका नाही.
सदर लेख दैनिक ‘पुढारी’ च्या १ नोव्हेंबर च्या अंकात प्रसिद्ध झाला होता. लेखाची लिंक-
https://www.pudhari.news/news/Bahar/Bihar-election-Nitish-Kumar-Tejaswi-Yadav-Chirag-Paswan/m/
लेखक टेलिग्राम वर आहे. लेखकाचे चॅनेल जॉईन करण्यासाठी https://t.me/ABhausaheb यावर क्लिक करा. त्यावर अपडेट्स मिळतील.
ट्विटर- https://twitter.com/BhausahebAjabe
फेसबुक- https://www.facebook.com/BhausahebAjabeSays/
यु ट्यूब – https://www.youtube.com/c/BHAUSAHEBAJABE