बिहार च्या विधानसभा निवडणुकीत आतापर्यंतचे सर्वाधिक ५७% मतदान झाले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या निवडणुकीत मतदारांचा असा प्रतिसाद दिसल्यामुले ‘काटे कि टक्कर’ होईल असा अनुमान होता. आणि झाले देखील तसेच. शेवटच्या फेरीपर्यंत महागठबंधन आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) चे आकडे खालीवर होत राहिले. शेवटी एनडीए १२५ आणि महागठबंधन ११० असा निकाल लागला. १२२ हा बहुमत देणारा आकडा आहे. त्यामुळे एनडीए ला बहुमताच्या वर अवघ्या ३ जागा मिळाल्या. मतांची टक्केवारी पाहिल्यास किती कडवी टक्कर झाली हे लक्षात येते. एनडीएला ३७.३% तर महागठबंधन ला ३७.२% मते मिळाली.

आरजेडी ७५ जागांसह सर्वात मोठा पक्ष झाला तर भाजप ७४ जागांसह एनडीए मधील मोठा मित्रपक्ष झाला. भाजप-जेडीयू च्या आघडीमध्ये पहिल्यांदाच भाजपला जेडीयू ला अधिक जागा मिळाल्या आहे. जेडीयू ला ४३ जागा जिंकता आल्या. चिराग पासवान यांच्या एलजेपी ची अवघ्या एका जागेवर बोळवण झाली आहे. काँग्रेस १९ तर डावे पक्ष १६ जागांवर विजयी झाले. असाउद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम या निवडणुकीच्या निमित्ताने भविष्यात दुर्लक्ष करता येणार नाही असे राजकीय अस्तित्व निर्माण केले आहे. एमआयएम ने ५ जागा मिळवल्या आहेत.


मतदारांचे फेरीनुसार बदलत गेलेले मत

या निवडणुकीत मतदानाच्या तीन फेऱ्या झाल्या. पहिल्या फेरीत मतदारांचा कौल महागठबंधनच्या बाजूने गेला. या फेरीत महागठबंधन ला ४८ तर एनडीए ला अवघ्या २१ जागा मिळाल्या. दुसऱ्या फेरीत एनडीए ला ५२ तर महागठबंधन ला ४२ मिळाल्या. तिसऱ्या फेरीत मात्र चित्र पहिल्या फेरीच्या उलट झाले. या फेरीत एनडीए ला ५२ तर महागठबंधन ला केवळ २१ जागा मिळाल्या.

पहिल्या फेरीनंतर नरेंद्र मोदींनी सभा धड्याक्यात घेतल्या.तेजस्वी यादव यांना ‘जंगलराज का युवराज’ म्हणत त्यांनी लालू प्रसाद यादव यांच्या काळातील आठवणी ताज्या केल्या. ‘ हि माझी शेवटची निवडणूक आहे’ असे भावनिक आवाहन नितीश कुमारांनी शेवटच्या फेरीच्या वेळी केली. याचा सकारात्मक परिणाम झाला असे दिसते.

महिला- सायलेंट वोट बँक

याशिवाय एक महत्वाचा बदल म्हणजे पहिल्या फेरीत पुरुषांनी केलेले मतदान महिलांपेक्षा १% अधिक होते. दुसऱ्या व तिसऱ्या फेरीत मात्र महिलांनी केलेले मतदान पुरुषांपेक्षा अनुक्रमे ६% व ११% अधिक होते. गेली १५ वर्षे नितीश कुमारांनी ‘महिलांची’ म्हणून व्होटबँक निर्माण केली आहे. महिलांसाठी कल्याणकारी योजना, शाळेत जाणाऱ्या मुलींसाठी सायकल असे कार्यक्रम त्यांनी राबवले आहेत. दारूबंदीचा निर्णयही त्यांनी महिलांना समोर ठेऊन घेतला होता. त्याने दारू मिळणे थांबले नसले तरी बहुसंख्य महिलांनी अंमलबजावनी पेक्षा नितीश कुमारांच्या हेतुंवर विश्वास ठेवला आहे असे दिसते. त्याचबरोबर केंद्र सरकाराच्या उज्वला सारख्या कल्याणकारी योजनांचाही सकारात्मक परिणाम झाला. महिलांचा असा प्रतिसाद मिळाला नसता तर एनडीए विजयी होणे अशक्य होते.

जातीय समीकरणे

जातीय समीकरणे बिहार च्या निवडणुकीत कळीची ठरतात. कथित उच्चजाती भाजप चा सामाजिक आधार आहे. नितीश कुमारांनी यादवेतर ओबीसी आणि महादलित असे समीकरण आपल्या मागे उभे केले. यावेळी महादलितांमध्ये चलबिचल होती. मात्र रविदास व पासवान या जाती वगळता दलितांनी एनडीए ची साथ दिलेली दिसते. महागठबंधन सोडून आलेले जितनराम मांझी (मुशाहर) व मुकेश साहनी (निषाद) यांचा एनडीए मधील सहभागही लाभदायक ठरला.

महागठबंधन चा सामाजिक आधार मुस्लिम व यादव आहेत. एमआयएम मुळे सीमांचल भागात महागठबंधन ला फटका बसला. आपला सामाजिक आधार महागठबंधन ला पूर्णतः टिकवता आला नाही. दुसरीकडे महादलितांमध्ये आपला पाया विस्तारता आला नाही. तेजस्वी यादव यांच्यासाठी मोठी उपलब्धी हीच कि त्यांना रोजगार या मुद्द्यावर युवकांना आकर्षित करता आले. त्यामुळेच शेवटपर्यंत ते स्पर्धेत राहू शकले.

चिराग पासवान यांचा नितीश कुमारांना फटका

चिराग पासवान यांनी जेडीयू तसेच एनडीए मधील इतर घटकपक्ष विकासशील इन्सान पार्टी (व्हीआयपी) व हिंदुस्थान अवाम मोर्चा (हाम) यांच्या सर्व उमेदवारांविरोधात एलजेपी चे उमेदवार उभे केले होते. एलजेपीने जरी जेडीयू विरोधातील एकच जागा जिंकली असली तरी एलजेपीमुळे तब्ब्ल ३२ जागांवर जेडीयू ला फटका बसला. या जागांवर जितक्या मतांनी जेडीयू चा उमेदवार पराभूत झाला त्यापेक्षा अधिक मते एलजेपी च्या उमेदवाराला मिळाली. व्हीआयपी व हाम ला देखील प्रत्येकी ४ व ३ जागांवर एलजेपीचा फटका बसला. एलजेपीचे बरेच उमेदवार भाजप कडून आयात केलेले होते. भाजप ला मानणारी व्होटबँक या मतदासंघामध्ये एलजेपी बरोबर गेल्याचे दिसते.

चिराग पासवान यांना जेडीयू च्या विरोधात उभे करणे ही भाजपची शहानिती होती असे म्हटले जाते. यामागे एनडीए मधील सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप पुढे यावा असा हेतू होता. तो हेतू साध्य झाला आहे. २०१० मध्ये ११५, २०१५ मध्ये ७१ जागा असलेल्या जेडीयू ची गच्छन्ती ४३ जागांवर झाली आहे. अमित शाह यांनी घोषित केल्याप्रमाणे नितीश कुमार हेच मुख्यमंत्री होतील पण सरकार वर प्रभाव भाजपचाच राहील हे निश्चित आहे.

नितीश कुमार विरोधी रोष

चिराग पासवान फॅक्टर बरोबर नितीश कुमार यांची मतदारांच्या मनोभूमीवरील सुटलेली पकड हे जेडीयू ला बसलेल्या फटक्याचे दुसरे कारण आहे. नितीश कुमारांच्या यांच्या १५ वर्षांच्या राजवटी विरोधी भावना मतदारांमध्ये होती. दारूबंदी, नल जल योजनेमधील भ्रष्टाचार, लॉकडाऊन काळात झालेल्या हालअपेष्टा अशा विविध कारणांसाठी त्यांच्याविरोधात अशी भावना निर्माण झाली होती. त्यांच्या सभांमध्ये त्यांच्याविरोधात घोषणा दिल्या गेल्या होत्या. एकहाती निवडणूक फिरवण्याची त्यांची क्षमता या वेळी अयशस्वी ठरली. नितीश कुमार यांची सर्व अर्थाने ही शेवटची निवडणूक ठरेल. ते स्वतः सत्तरीच्या उंबरठयावर आहे. जेडीयू मध्ये ते वगळता इतर कोणी सक्षम नेतृत्व नाही. त्यांच्या राजकीय कमजोरीचा थेट लाभार्थी भाजप आहे.

तेजस्वी यादव – मॅन ऑफ द मॅच

तेजस्वी यादव यांचा मर्यादित राजकीय अनुभव आणि लोकसभा निवडणुकीत उडालेला धुव्वा यामुळे राष्ट्रीय जनता दलचा (आरजेडी) तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली टिकाव लागेल का अशी चर्चा २ महिन्यांपूर्वी पर्यंत केली जात होती. २०१० च्या विधानसभा निवडणुकीत आरजेडीला केवळ २२ जागा मिळाल्या होत्या. २०१५ मध्ये ८० मिळाल्या खऱ्या पण त्याचे श्रेय जेडीयू बरोबर केलेल्या आघडीला दिले जात होते. त्यामुळे यावेळी लालू प्रसाद यादव उपस्थित नसताना आरजेडी ला सर्वाधिक ७५ जागा मिळणे हि मोठी कामगिरी आहे. आरजेडी मध्ये खऱ्या अर्थाने लालू प्रसाद ते तेजस्वी यादव अशी खांदेपालट या निमित्ताने झाली आहे. या वेळी ३१ व्या वर्षी मुख्यमंत्रीपदाची संधी त्यांनी थोडक्यात गमावली असली तरी भविष्यात ते या पदासाठीची प्रबळ दावेदार असतील यात शंका नाही. त्यांच्या प्रचारसभांना सर्वाधिक प्रतिसाद मिळाला. प्रचाराचे सूत्र ही त्यांनी शेवटपर्यंत आपल्या ताब्यात ठेवले. ‘रोजगार’ हाच मुद्दा त्यांनी केंद्रस्थानी ठेवला. १० लाख सरकारी नोकऱ्या देण्याचे त्यांनी आश्वासन दिल्यानंतर भाजपलाहि १९ लाख रोजगार संधी निर्माण करू असे आश्वासन द्यावे लागले होते.

जेपी आंदोलनातील पिढीचे राजकारण शेवटाकडे चालले आहे. भाजप कडे राज्य पातळीवर प्रभावी ठरेल असा नेता या क्षणाला नाही. चिराग पासवान यांच्याकडे उपद्रव क्षमता असली तरी त्यांच्या राजकारणाला मर्यादा आहेत. भविष्यात लालू प्रसाद यादव व नितीश कुमारांप्रमाणे बिहारच्या राजकारणावर पकड ठेऊ शकेल असे नेतृत्वगुण तेजस्वी यादव यांनी या निवडणुकीत दाखवून दिले आहेत.

मोदींचा करिष्मा

कोरोनाच गैर-व्यवस्थापन, बेरोजगारीचा उच्चांक, गर्तेत गेलेली अर्थव्यवस्था, चीन संदर्भात झालेली नामुष्की अशा गोष्टी असूनही नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता कमी झालेली नाही. या निवडणुकीतील भाजपचा चेहरा मोदी हेच होते. विरोधकांची खिल्ली उडवणे आणि राष्ट्रीय मुद्दे हेच मोदींच्या प्रचाराचे सूत्र होते. नितीश कुमारांविषयी असलेल्या नाराजीचा फटका भाजपला बसला नाही याचे कारण मोदी हेच आहे. २०१५ मध्ये ५३ जागा असलेल्या भाजपला यावेळी ७४ जागा मिळाल्या. भविष्यात बिहार मध्ये आरजेडी आणि भाजप मधेच मुख्य सामना होईल हे या निवडणुकीने स्पष्ट केले आहे. ही निवडणूक भाजप साठी अत्यंत महत्वाची होती. शासकीय धोरणे फसली तरी मतदारांना भुलवण्याचा मंत्र भाजपला सापडला आहे. तो या निवडणुकीत सिद्ध झाला. हाच मंत्र आता आगामी निवडणुकांमध्ये विशेषतः पश्चिम बंगाल मध्ये वापरला जाईल. बिहार हे हिंदी पट्यातील एकमेव राज्य आहे जिथे भाजपला एकहाती प्रभाव टाकता आलेला नाही. जेडीयू कमजोर होत असताना, भविष्यात तो तसा निश्चित टाकतात येईल हे या निवडणुकीने स्पष्ट केले आहे.

बिहार बरोबर मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि गुजरात मधे झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपने वर्चस्व राखले आहे. मध्य प्रदेश मध्ये २८ पैकी १६ जागांवर भाजपने विजय मिळाला आहे. परिणामी भाजप चे मध्य प्रदेश मधील सरकार स्थिर झाले आहे. आपल्या सरकार पाडण्याच्या प्रयोगाला लोकमान्यता मिळाली आहे असा याचा अर्थ भाजपकडून लावला जातो. त्यामुळे आगामी काळात राजकारणाच्या ‘मोदी-शहा’ नीतीला ब्रेक लागण्याची शक्यता नाही.

सदर लेख दैनिक पुढारीच्या १५ नोव्हेंबर च्या अंकात प्रसिद्ध करण्यात आला.
लेखाची लिंक- https://www.pudhari.news/news/Bahar/Interpretation-of-Bihar-result/m/

लेखक टेलिग्राम वर आहे. लेखकाचे चॅनेल जॉईन करण्यासाठी https://t.me/ABhausaheb यावर क्लिक करा. त्यावर अपडेट्स मिळतील.

ट्विटर- https://twitter.com/BhausahebAjabe
फेसबुक- https://www.facebook.com/BhausahebAjabeSays/

यु ट्यूब – https://www.youtube.com/c/BHAUSAHEBAJABE

By Bhau

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *