६ एप्रिल भाजप चा स्थापन दिवस. भाजप म्हणून, या पक्षाची स्थापना ४० वर्षांपूर्वी म्हणजे १९८० मध्ये झालेली असली तरी, तरी १९२५ या पक्षाचा आरंभबिंदू आहे,कारण त्या साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच ‘आरएसएस’ ची स्थापना झाली. भाजप संघ परिवाराचे राजकीय अंग आहे. स्वातंत्र्यपूर्वकाळी, हिंदुत्ववादी विचारधारेच्या संदर्भात,हिंदू महासभा हा पक्ष, भाजपची राजकीय भूमिका पार पाडत होता. वि दा सावरकर महासभेचे दीर्घकाळ अध्यक्ष होते. त्यामुळे भाजपला महासभेचा वारसा हि आहे असे म्हणता येईल.
स्वातंत्र्यानंतर,जनसंघाची स्थापना, संघाने केली. अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी हे जनसंघाचेच काम करत होते. त्यामुळे भाजप चा वैचारिक आधार शोधायचा असेल तर त्याची १९२५ पासून सुरुवात करायला हवी.
जमातवाद
१९२५ पासून आजतागायत भाजप चा राजकारणाचा चा आधार हा ‘जमातवादी'(कम्युनल) राहिला आहे. धार्मिक,सामाजिक सौहार्द जिथे आहे, तिथे भाजप चे राजकारण यशस्वी होत नाही किंवा आपल्या वैचारिक राजकारणाला त्यांना मुरड तरी घालावी लागते. त्यामुळे ‘सामाजिक दुही’ निर्माण करण्याचे भाजप चे प्रयत्न अहोरात्र चालू असतात.पूर्वीहि ते चालू होतेच, आता, फेसबुक, ट्विटर, व्हाट्स अप वर आपल्याला ते रोज दिसतात इतकाच काय तो फरक. त्यामुळे भाजप चा सर्वोच्च नेता ते अत्यंत सामान्य समर्थक यांचे विचार यात जमातवादी साम्य दिसते यात आश्चर्य नाही. पूर्वी फक्त शाखा, मूलतत्त्ववाद बिंबवण्याचे केंद्र होती. आता शाखेबरोबर, सोशल मीडियातूनही अहोरात्र बिंबवले जाते. म्हणूनच २०१४ नंतर ‘पूर्वी इतके कम्युनल वातावरण नव्हते’ असे आपल्याला अनेकजण म्हणताना दिसतात. त्यामुळे भाजपकडून ‘सामाजिक सौहार्द’ हे अजेंडा वर येऊ शकत नाही हे नक्की. द्वेष, त्यातून निर्माण होणारी सामाजिक हिंसा हाच भाजपचा मूलाधार आहे.
पुराणमतवाद
सामाजिक/धार्मिक दृष्ट्या संघ-भाजप पुराणमतवादी आहे.लोकांच्या श्रद्धा-अंधश्रध्दांचा परिपोष करणारा आहे. वर्णवर्चस्ववादी मूल्यांचा प्रभाव त्याद्वारे लोकांच्या जाणिवेत ठेवता येतो हे भाजप ला चांगले माहित आहे. वर्णवर्चस्ववादाचे सांस्कृतिक वर्चस्व प्रस्थापित करणे, ते टिकवणे हा भाजप चा गाभ्याचा(कोअर) अजेंडा आहे. त्यामुळेच समता नव्हे तर ‘समरसता’ यावर संघ-भाजप भर देते. सांस्कृतिक पातळीवरील विशिष्ट मूल्यांचे वर्चस्व हे, वरवरच्या ‘सामाजिक इंजिनिअरिंग’ च्या मागे दडवता येते. उदाहरणार्थ ‘संघ परिवार जातभेद मानत नाही’, याच्यामागे जातवर्चस्वाचा सांस्कृतिक,वैचारिक अजेंडा लपवला जातो. त्यात संघ-भाजपला यश आले आहे यात शंका नाही. या संदर्भात सत्ताप्राप्तीचे,ध्येय ठेऊन, तडजोडीचे राजकारण, संघ परिवाराने, बाळासाहेब देवरस सरसंघचालक झाल्यापासून, स्वीकारले हेही नमूद करायला हवे.
सेवाभावी स्वरूप
स्वातंत्र्यपूर्व काळात रचनात्मक, सामाजिकदृष्ट्या विधायक कामांची सुरुवात महात्मा गांधींनी केली. ती परंपरा, विविध गांधीवादी व्यक्ती व संघटनांनी, स्वातंत्र्यानंतर, २-३ दशके,जोमाने चालू ठेवली. संघाला, अशा कामांचे ‘राजकीय’ महत्व कळाल्यानंतर, संघाने ,वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये, सेवाभावी संघटनांचे,व्यापक जाळे उभे केले.त्यातून दोन गोष्टी साध्य करता आल्या. एक म्हणजे संघ सेवाभावी आहे दाखवता आले.त्यातून प्रतिमासंवर्धन झाले. आणि दुसरे म्हणजे या गोष्टी भाजप च्या राजकारणाला पोषक ठरल्या.
जमातवादाचा अजेंडा , धार्मिक/सामाजिक पुराणमतवादी दृष्टी आणि सेवाभावी स्वरूप या तीन गोष्टी ;भाजपचे ,आजचे राजकीय/सत्ताकारणातले यश समजून घेण्यासाठी लक्षात घ्यायला हव्यात. अर्थात जे यश मिळाले आहे त्याचे विश्लेषण अनेक अंगानी करता येईल. त्या यशाच्या मागे अनेक घटक, कथा आहेत. पण तूर्तास, या लेखाच्या संदर्भात या तीन गोष्टी पाहू.
जमातवादाचा सामना आणि काँग्रेस विचारधारा
दुसरीकडे याच काळात काँग्रेस/इतर पुरोगामी पक्षांना जमातवादाचा सामना करण्यात अपयश आले. त्याचा राजकीय/सत्तास्पर्धेतील सामना कसा करायला हवा होता, त्यात यश मिळाले असते किंवा नाही, याविषयी मतमतांतरे असू शकतात. पण वैचारिक सामना करण्यातील अपयश मात्र अक्षम्य आहे. भाजप च्या ‘प्रोपागंडा’ चा प्रतिवाद करणे, आणि आपल्या मूल्यप्रणालीचा (स्वातंत्र्यलढ्यातील मूल्ये/घटनादत्त मूल्ये) प्रचार, प्रसार करणे, यासाठीची यंत्रणा काँग्रेस व समविचारी पक्षांना उभी करता आली नाही. त्यामुळेच या पक्षांमधील बहुतांशी (हो बहुतांशी!) नेते, कार्यकर्ते, समर्थक यांच्यामधेच ‘विचारधारेविषयी स्पष्टते’चा अभाव दिसतो. त्यांच्या डोक्यातील वैचारिक गोंधळ, प्रश्न सोडवू शकतील अशी यंत्रणा या पक्षांमध्ये नाही. बरेच नेते, कार्यकर्ते/समर्थक हे,संघ- भाजप च्या वैचारिक ट्रॅप मध्ये सापडलेले दिसतात. राज्यसत्ता काबीज करताना, ती टिकवण्यासाठी, वैचारिक सत्ता हि टिकवून ठेवायला हवी, याचे भान दुर्दैवाने या पक्षांना राहिले नाही.
त्यामुळे आता तशी यंत्रणा उभी केल्याशिवाय काँग्रेस व इतर समविचारी पक्षांना गत्यंतर नाही. काँग्रेस चा युगधर्म काँग्रेसलाच माहित नसेल तर काँग्रेस टिकू शकत नाही. जी वैचारिक स्पष्टता राहुल गांधींनी आहे, तीच जेव्हा, तितक्याच तीव्रतेने, सामान्य कार्यकर्ता/समर्थकामधेही असेल ,तेव्हा काँग्रेस ला नवसंजीवनी मिळेल यात तिळमात्र शंका नाही! कारण काँग्रेस चा विचार, व्यक्ती आणि समाजाला पुढे घेऊन जाणारा असा आहे. सामाजिक सौहार्द, वैविध्यता टिकविणारा आहे. सामाजिक न्याय त्या विचाराचा आधार आहे..
धर्म
धर्मा पासून चार हात लांब राहण्याची वृत्ती ठेवल्यामुळे, धर्माचे क्षेत्र ,संघ-भाजपला बऱ्याच अंशी काबीज करता आले. धर्माला जवळ करणे, म्हणजे भाजप प्रमाणे धर्माला राजकारणाचा मूलाधार बनविणे नव्हे. महात्मा गांधींनी धार्मिक असूनही धर्माला राजकारणाचा मूलाधार होऊ दिले नाही. आजच्या संदर्भांत,तसे धार्मिक आचरण काय आहे हे पाहणे आणि ते सार्वजनिक आयुष्यात प्रकट करणे गरजेचे आहे. हे धार्मिक आकलन आणि आचारण, भाजपच्या धार्मिक आकलन आणि आचरणापेक्षा भिन्न आहे हे उघड आहे. त्यामुळे त्यास ‘सॉफ्ट हिंदुत्व’ म्हणणे चुकीचे ठरेल.थोडक्यात, धर्माविषयक डावे आकलन काँग्रेस ने तातडीने सोडून द्यायला हवे. या संदर्भांत महात्मा गांधी मार्गदर्शक आहेत.
सेवादल
काँग्रेसचे ,सेवादल ,स्वातंत्र्यपूर्व काळापासून, विधायक, सेवाभावी कार्यात सहभागी होते. काँग्रेस कार्यकर्ते त्या माध्यमातून सेवाभावी, सामाजिक स्वरूपाची कामे करत असत. राजकीय कार्यकर्ता आणि सामाजिक कार्यकर्ता अशी भिन्न ओळख, त्यावेळी काँग्रेस कार्यकर्त्याची नव्हती. वैचारिक जडणघडण देखील सेवादलाच्या माध्यमातून होत होती. त्यामुळेच सेवादलाची पीछेहाट होण्यातून काँग्रेस चे अपरिमित नुकसान झाले. त्याचा अपरिहार्य परिणाम राजकीय यशावरही झाला.
म्हणून सेवादलाला पुन्हा जोमाने काँग्रेस ला उभे करावे लागेल. सत्ता असो-नसो सेवादलाच्या माध्यमातून सेवाभावी कामे झाली, तर समाजाशी असणारी नाळ टिकून राहील. विधायक कामातून कार्यकर्त्याचा आत्मविश्वास कायम राहील. सामाजिक कार्यकर्ता आणि राजकीय कार्यकर्ता हे द्वैत त्या माध्यमातून संपवता येईल.
भाजप ,आज राजकीय दृष्ट्या प्रबळ झाला आहे. त्यामुळे भाजपला राजकीय शह देण्यासाठी निव्वळ राजकीय आयुधे पुरेशी ठरणार नाहीत. त्यासाठी संघ-भाजप ची यंत्रणा आणि विचारधारा समजून घ्यावी लागेल. आणि त्याला पर्यायी यंत्रणा निर्माण करावी लागेल, आहे ती भक्कम करावी लागेल. विचारधारा, धर्म आणि समाजसेवा या तीन मूलभूत गोष्टींना टाळल्यास, काँग्रेसचा राजकीय विजनवास संपणार नाही.
भाजप चे शरसंधान भाजप चे मर्मस्थळ समजून घेतल्याशिवाय होणार नाही!
लेखक टेलिग्राम वर आहे. लेखकाचे चॅनेल जॉईन करण्यासाठी https://t.me/ABhausaheb यावर क्लिक करा. त्यावर ब्लॉग चे अपडेट्स मिळतील.
ट्विटर- https://twitter.com/BhausahebAjabe
फेसबुक- https://www.facebook.com/BhausahebAjabeSays/
यु ट्यूब – https://www.youtube.com/c/BHAUSAHEBAJABE